अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्सवर मोठी अपडेट;परदेशात पाठवण्याचा विचार?

    16-Feb-2026
Total Views |
 
black box from Ajit Pawar
Image Source:(Internet)
मुंबई :
२८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीकडे निघालेले त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना अचानक बिघाड होऊन जमिनीवर आदळले आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात विमानाला आग लागली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती.
 
अपघातानंतर दुसऱ्या दिवशी घटनास्थळावरून विमानातील ब्लॅकबॉक्स जप्त करण्यात आला. मात्र हा ब्लॅकबॉक्स आगीत अंशतः जळालेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यातील नोंदी सुरक्षित राहिल्या आहेत का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अपघाताची खरी कारणे समजून घेण्यासाठी या उपकरणातील माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
 
तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे हा ब्लॅकबॉक्स परदेशातील विशेष प्रयोगशाळेत पाठवण्याचा पर्याय सरकारसमोर असल्याची चर्चा आहे. केंद्र स्तरावर याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डेटा पुनर्प्राप्तीनंतर उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांबाबत नेमकी माहिती समोर येऊ शकते.
 
दरम्यान, दुर्घटनेबाबत विविध अटकळी लावल्या जात असताना ब्लॅकबॉक्समधील नोंदीच सत्य स्पष्ट करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकार कोणता निर्णय घेते आणि तपासाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.