वैष्णवी हगवणे प्रकरण; सहाही आरोपींवर आरोप निश्चित, 23 फेब्रुवारीपासून सुनावणी

    14-Feb-2026
Total Views |
 
Vaishnavi Hagavane
 Image Source:(Internet)
पुणे/पिंपरी-चिंचवड :
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane) मृत्यू प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे. या प्रकरणातील सहाही आरोपींवर सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले असून, 23 फेब्रुवारीपासून खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता या खटल्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
 
वैष्णवीचा मृतदेह 16 मे रोजी भुकूम येथील सासरी घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे नमूद करण्यात आल्याने आत्महत्या की खून, याबाबत संशय निर्माण झाला होता. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
 
17 मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली. जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
 
आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक व मानसिक छळ, कट रचणे तसेच पुरावे नष्ट करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. निलेश चव्हाण याच्यावर अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे आणि कुटुंबीयांना धमकावल्याचा अतिरिक्त आरोपही आहे. नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती.
 
वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नावेळी गाडीची मागणी करण्यात आली होती, तसेच विवाहानंतरही हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते; मात्र ते प्रकरण दडपल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
 
आता सत्र न्यायालयात आरोप निश्चित झाल्याने खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर होणारे पुरावे यावर न्यायालयाचा अंतिम निर्णय अवलंबून असणार आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, हीच राज्यातील जनतेची भावना असून येत्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.