टिपू सुलतानांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे;सपकाळांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले

    14-Feb-2026
Total Views |
 
Politics heated up Sapkal
 Image Source:(Internet)
मुंबई :
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Sapkal) यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. शौर्याच्या बाबतीत टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे, अशी टिप्पणी सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेत माफीची मागणी केली आहे.
 
सपकाळ नेमके काय म्हणाले?
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याचा विचार मांडला आणि शौर्य दाखवले, त्याच प्रेरणेने टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. “टिपू सुलतान हे भारताचे भूमीपुत्र होते. त्यांनी कधीही विषारी किंवा विखारी विचारांना थारा दिला नाही. शौर्याच्या दृष्टीने त्यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
 
भाजपाची तीव्र प्रतिक्रिया-
सपकाळ यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत टीका केली. “टिपू सुलतान यांची तुलना शिवाजी महाराजांशी करणे अत्यंत निंदनीय आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारून रयतेचे राज्य निर्माण केले. मोगलांच्या जोखडातून सामान्य जनतेची मुक्तता केली. त्याउलट टिपू सुलतान यांच्या कारकिर्दीत हजारो हिंदूंची हत्या झाल्याचा इतिहास आहे,” असा दावा फडणवीस यांनी केला.
 
तसेच, “दोघांना समान सन्मान द्यावा असे म्हणणे म्हणजे इतिहासाचे विकृतीकरण आहे. सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.
 
राजकीय वातावरण तापले-
या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरून वाद पेटला आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून येत्या काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे