नागपूर कला संघाच्या ‘कला महोत्सवा’चा भव्य शुभारंभ; ‘कला कार’ने वेधले सर्वांचे लक्ष

    14-Feb-2026
Total Views |
 
Nagpur Kala Sangh
 Image Source:(Internet)
नागपूर :
युज फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित नागपूर कला संघाच्या  (Kala Sangh) तृतीय ‘कला महोत्सवा’चा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. मुंबई येथील Sir J. J. School of Art, Architecture and Design चे कुलगुरू प्रा. हिम चॅटर्जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ‘कला कार’चे अनावरण करून महोत्सवाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
 
‘द फ्युचर इज नाऊ’ या संकल्पनेवर आधारित हा सार्वजनिक कला महोत्सव VR Nagpur येथे महिनाभर चालणार आहे. उद्घाटनप्रसंगी शिवर लोककला संस्कृती संस्थानच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक महाराष्ट्रीय लोकनृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विविध ठिकाणी उभारलेल्या कलादालनांना भेट देऊन कलाकृतींची पाहणी केली.
 
या महोत्सवात १२० हून अधिक चित्रकृती, शिल्पकृती, छायाचित्रे तसेच विविध माध्यमांतील कलानिर्मिती प्रदर्शित करण्यात आली आहे. शासकीय चित्रकला महाविद्यालय – कला व रचना, नागपूर तसेच श्री कला महाविद्यालय व नागपूर कला संघातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा त्यामध्ये समावेश आहे.
 
‘कला कार’ ही संकल्पना बहुआयामी कलाकार विनय चानेकर यांनी शासकीय चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने साकारली आहे. तसेच व्हीआर नागपूरच्या तळमजल्यावरील भिंतींना कलादालनाचे स्वरूप देत ‘तळमजला कला प्रकल्पा’अंतर्गत श्री कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
 
महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवात चित्रप्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शनी, संगीत सादरीकरण, कलापट प्रदर्शन, कार्यशाळा, युवा कलाकार स्पर्धा तसेच कारागीर बाजार यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनेस्कोच्या सहकार्याने ‘पॉकेट्स ऑफ होप’ या छायाचित्र प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती नागपूर कला संघाच्या संयोजिका सुमी गुप्ता यांनी दिली.
 
प्रा. हिम चॅटर्जी म्हणाले, विदर्भातील युवा कलाकारांना सार्वजनिक कला महोत्सवात प्रत्यक्ष सहभागाचा अनुभव देणारे हे एकमेव व्यासपीठ आहे. वर्गखोल्या व दालनांच्या मर्यादेबाहेर जाऊन शहराशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना येथे मिळते. अशा प्रत्यक्ष अनुभवानंतरच समर्थ कलाकार घडतात आणि शहराचे सांस्कृतिक भविष्य अधिक बळकट होते.