Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूरात (Nagpur) अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५१२ ग्रॅम मेथिलीनडायऑक्सी मेथॅम्फेटामाईन (एमडी) पावडर जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या साठ्याची किंमत सुमारे १ कोटी २ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी ५१ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे.
१३ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री गणेशपेठ परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना राजाराम देवी चौक, सुभाष रोड येथील अभ्यंकर भवन परिसरात एमडीची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून दुचाकीवर आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्या वाहनाच्या डिकीतून मोठ्या प्रमाणात एमडी पावडर आढळून आली.
चौकशीत आरोपीने आपले नाव संजय रामप्रसाद गंगवानी (रा. गणेशपेठ) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल फोन, एक हेल्मेट आणि ४१ हजार रुपये रोखही जप्त केले. एकूण मुद्देमालाची किंमत १ कोटी ३ लाख ८२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
तपासात या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशातील इंदूरपर्यंत पोहोचले असून, तेथील एका फरार साथीदाराने खासगी वाहतूक कुरिअरमार्फत हा साठा पाठविल्याचे उघड झाले आहे. संबंधित फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.