Image Source:(Internet)
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली. या विजयासह झिम्बाब्वेचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला गेला, तर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने निर्धारित षटकांत २ बाद १६९ धावांचा भक्कम डाव उभारला. प्रत्युत्तरात १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९.३ षटकांत १४६ धावांवर आटोपला.
झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. दुसऱ्याच षटकात जोश इंगलिस बाद झाला आणि त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन व टिम डेव्हिड यांनाही फारशी कामगिरी करता आली नाही. एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद २९ अशी झाली होती. ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू रेनशॉ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ती झुंज अपुरी ठरली. रेनशॉने ६५ धावांची खेळी केली, तर मॅक्सवेलने ३१ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझारबानी याने ४ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत टाकले, तर ब्रॅड इव्हान्सने ३ गडी बाद केले.
त्याआधी झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळीचे मिश्रण दाखवले. तादिवानाशे मारुमानी आणि ब्रायन बेनेट यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. मारुमानीने २१ चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर रायन बर्ल आणि बेनेट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भर घातली. बर्लने ३५ धावांचे योगदान दिले. बेनेटने ५६ चेंडूत ६४ धावा करत नाबाद राहिला. कर्णधार सिकंदर रझा यानेही १३ चेंडूत २५ धावांची जलद खेळी करत संघाचा डाव मजबूत केला.
झिम्बाब्वेच्या शिस्तबद्ध फलंदाजी आणि धारदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे स्पर्धेतील पुढील सामने अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.