वंदे मातरम्’वरून राजकारण तापले; प्यारे खान यांचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाले...

    13-Feb-2026
Total Views |
 
Pyare Khan
 Image Source:(Internet)
नागपूर :
‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) या राष्ट्रीय गीतावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सध्या ज्या पद्धतीने हा मुद्दा पुढे आणला जात आहे, तो मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
प्यारे खान म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ ही काही नवी गोष्ट नाही. २०१४ पूर्वी राष्ट्रीय गीताबाबत कुणालाही आक्षेप नव्हता. मात्र आता जाणीवपूर्वक हा विषय पुढे करून वातावरण तापवले जात आहे, असे त्यांनी नमूद केले. देशातील मुस्लीम समाज सुशिक्षित असून त्यांना दिशाभूल करणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
इस्लामच्या शिकवणुकीनुसार ज्या देशात राहतो, त्या देशाच्या कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी देशाच्या कायद्याविषयी निष्ठा अधोरेखित केली. मुस्लीम समाजावर कोणतीही जबरदस्ती होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
पूर्वी उर्दू शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ नियमितपणे गायले जात असे. शाळांच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते समाविष्ट असे आणि त्यावेळी कुणीही आक्षेप घेतला नव्हता. अनेक मुस्लीम शिक्षक स्वतः हे गीत गात आणि विद्यार्थ्यांकडूनही गाऊन घेत, अशी आठवण त्यांनी करून दिली.
 
समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न थांबवावेत, असे आवाहन करत मुस्लीम समाजाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी म्हटले. देशातील मुस्लीम समाज योग्य दिशेने पुढे जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
दरम्यान, अलीकडच्या काळात काही ठिकाणी शाळा व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायनाबाबत वाद निर्माण झाल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. नागपुरात केलेल्या या विधानामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.