लिलावती रुग्णालय प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप; अनिल देशमुखांची सखोल चौकशीची मागणी

    13-Feb-2026
Total Views |
 
Anil Deshmukh
 Image Source:(Internet)
नागपूर :
लिलावती रुग्णालयातील (Lilavati Hospital) कथित गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
 
देशमुख म्हणाले की, गृहमंत्रीपदाच्या काळात आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हेतुपुरस्सर होते. आता लिलावती रुग्णालयातील घडामोडींमुळे काही नवीन बाबी समोर येत असून, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाने काही कारणांमुळे त्यांना पदावरून दूर केल्यानंतर विविध तक्रारी पुढे आल्याचा दावा त्यांनी केला.
 
रुग्णालयातील काही विश्वस्त आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बढतीसाठी मोठ्या रकमांची मागणी झाल्याचा आरोप केल्याचे देशमुख यांनी नमूद केले. या तक्रारींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटक साहित्य सापडल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. त्या प्रकरणाच्या तपासात सुरुवातीला काही विसंगती असल्याचा आरोप करत पुढे तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
तसेच कथित वसुली प्रकरणाचा उल्लेख करत देशमुख म्हणाले की, या संदर्भात त्यांनी स्वतः चौकशीची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती; मात्र समन्स बजावूनही संबंधित अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
 
लिलावती रुग्णालयातील प्रकरणामुळे पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सांगत देशमुख यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.