गोंदियातील डॉक्टरचा थरकाप उडवणारा प्रकार; १० दिवसांच्या बालिकेचा ३ लाखांत सौदा

    13-Feb-2026
Total Views |
 
Gondia doctor
 Image Source:(Internet)
गोंदिया :
ज्या वैद्यकीय व्यवसायाला समाजात देवदूतासमान मान दिला जातो, त्याच पवित्र पेशावर काळिमा फासणारी संतापजनक घटना विदर्भात उघडकीस आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या नवजात बालिकेची उपचाराच्या बहाण्याने तब्बल ३ लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या आंतरजिल्हा रॅकेटचा मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी सध्या फरार आहे.
 
उपचाराचा बहाणा, विक्रीचा कट-
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील बालाजी रुग्णालयात एका गरीब दाम्पत्याने आपल्या नवजात मुलीला उपचारासाठी दाखल केले होते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत संबंधित डॉक्टरने पालकांना “उपचाराचा खर्च मोठा होईल” अशी भीती दाखवली. त्यानंतर नागपूरमधील एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत उपचार करून देण्याचे आमिष दाखवत बाळाला आपल्या ताब्यात घेतले.
 
मात्र, उपचारासाठी पाठवण्याऐवजी बालिकेची भंडारा जिल्ह्यातील पांढराबोडी येथील मालती वाघमारे या महिलेला ३ लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचे तपासात उघड झाले.
 
गोपनीय माहितीवरून कारवाई-
भंडारा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी येथे एका महिलेकडे संशयास्पदरीत्या नवजात बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे संशय अधिक गडद झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बालिकेला ताब्यात घेतले आणि सखोल तपास सुरू केला. त्यातून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला.
 
पाच जणांवर गुन्हा-
या प्रकरणी डॉक्टर नितेश बाजपेयी, ललेश्वरी सादेपाच, मालती वाघमारे, पौर्णिमा धुर्वे आणि उमेशसिंग गहलोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ललेश्वरी सादेपाच हिला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीसह इतर चार जण फरार आहेत.
 
तपासात उघड झाले की, ३ लाख रुपयांपैकी १ लाख रुपये रोख देण्यात आले, १ लाखाचा धनादेश मध्यस्थाच्या खात्यात जमा करण्यात आला होता, तर उर्वरित १ लाख रुपये ५ फेब्रुवारीला देण्याचे ठरले होते.
 
संतापाची लाट-
गरिबीचा फायदा घेत नवजात बालिकेचा सौदा करणाऱ्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण विदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत, याचा तपास सुरू असून पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.मानवतेलाच काळिमा फासणाऱ्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रावरील विश्वासाला मोठा धक्का बसला आहे.