Image Source:(Internet)
शिर्डी:
‘जय साईराम’च्या घोषात आणि फुलांनी सजलेल्या रथाच्या साक्षीने शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) शिर्डीत १४ किलोमीटरच्या साई परिक्रमेचा (Sai Parikrama) उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.
पहाटे महाआरती, रथ ओढून प्रारंभ-
पहाटे ५.३० वाजता खंडोबा मंदिर येथे साईबाबांच्या प्रतिमेची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महंत रामगिरी महाराज, काशीकानंद महाराज आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते रथ ओढून परिक्रमेची सुरुवात झाली. या वेळी संपूर्ण परिसर भक्तीभावाने भारावून गेला होता.
गेल्या सहा वर्षांपासून ग्रीन एन फाउंडेशन, साईबाबा संस्थान, ग्रामस्थ, नगरपरिषद तसेच पोलीस व महसूल विभाग यांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित केला जात आहे. यंदा सातव्या वर्षीही देशभरातून लाखो भाविक सहभागी झाले असून महिला व बालकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
विविध मार्गांवरून १४ किमीचा प्रवास-
शिर्डी येथील खंडोबा मंदिरापासून सुरू झालेली परिक्रमा शिर्डी पोलीस ठाणे, शिव रस्ता, लुटे वस्ती, बिरोबाबन आणि साकुरी शिव मार्गाने पुन्हा मंदिर परिसरात दाखल झाली. टाळ-मृदुंगाचा निनाद, भजन-कीर्तनांचा गजर आणि भगव्या पताकांनी सजलेले रथ यामुळे मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
राज्याबाहेरूनही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. रतलाम येथून सुमारे ५०० भाविक रथांसह शिर्डीत आले. एकूण १५ ते २० रथ या परिक्रमा सोहळ्यात सहभागी झाले.
सुव्यवस्थित आयोजन-
विजया एकादशी निमित्त अनेक भाविकांनी उपवास केला होता. परिक्रमा मार्गावर जवळपास १०० ठिकाणी चहा, अल्पोपहार, फळे आणि पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली. आरोग्य पथके, स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेची काळजी घेत शिस्तबद्ध नियोजन केले.
१५ मार्च २०२० रोजी सुरू झालेली ही परंपरा दरवर्षी अधिक व्यापक होत असून, यंदाही श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभागाचा अनोखा संगम शिर्डीत अनुभवायला मिळाला.