Image Source:(Internet)
मुंबई:
राज्य मंत्रालयात (Mantralaya) गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेनंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी संबंधित कर्मचाऱ्याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तडजोडीनंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरले आणि रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्यांनी तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात त्याला ताब्यात घेतले.
कारवाईनंतर मंत्री कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली असून आवश्यक पुरावे गोळा केले जात आहेत. अटकेतील कर्मचाऱ्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात इतर कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी संबंधित लिपिकाची कृती वैयक्तिक असल्याचे सांगितले. तपासात आपला कोणताही संबंध आढळल्यास जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विरोधी पक्षाने या घटनेचा निषेध करत मंत्रालयातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.