नागपुरात ५० ‘पीएम ई-बस’ची एन्ट्री; उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

    13-Feb-2026
Total Views |
 
PM
 Image Source:(Internet)
नागपूर :
शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत हरित क्रांती घडवणाऱ्या ५० अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस नागपूरच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या ‘पीएम ई-बस’ (PM e-buses) उपक्रमांतर्गत या बसेस नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पित केल्या जाणार आहेत. कोराडी आगार येथे हा कार्यक्रम पार पडणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
 
महानगरपालिका संचलित ‘आपली बस’ सेवेत या पूर्णपणे वातानुकूलित ई-बसेसचा समावेश होणार आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.
 
हरित आणि शाश्वत वाहतुकीकडे महत्त्वाचे पाऊल-
‘पीएम ई-बस’ योजना नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देणारी ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० बसेस शहरात दाखल झाल्या असून पुढील टप्प्यांत एकूण १५० बसेस सेवेत आणण्याचे नियोजन आहे. या उपक्रमामुळे शहरातील कार्बन उत्सर्जनात घट होऊन स्वच्छ आणि पर्यावरणपूरक नागपूरच्या दिशेने मोठे पाऊल टाकले जाणार आहे.
 
आधुनिक सुविधांचा समावेश-
९ मीटर लांबीच्या या ई-बसेसमध्ये ‘२५+१’ आसनव्यवस्था असून त्या पूर्णपणे वातानुकूलित आहेत. दिव्यांग प्रवाशांसाठी हायड्रोलिक ई-रॅम्पची विशेष सोय करण्यात आली आहे. अवघ्या ३० मिनिटांच्या रॅपिड चार्जिंगनंतर या बसेस सुमारे २२५ किलोमीटरपर्यंत धावू शकतात. त्यामुळे शहरातील ११ प्रमुख मार्गांवर अखंड आणि कार्यक्षम सेवा देणे शक्य होणार आहे.
 
या नव्या ई-बसेसमुळे नागपूरकरांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.