Image Source:(Internet)
मुंबई :
केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी धोरणांविरोधात विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आज देशव्यापी ‘भारत बंद’ (Bharat Bandh) ची हाक दिली आहे. मुंबईसह राज्यभर आंदोलन, मोर्चे आणि निदर्शने करण्यात येणार असून, मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी तीन वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, एनटीयूआय, भारतीय कामगार सेना, एआयसीसीटीयू, एआयबीईए, बीईएफआय, एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, श्रमिक एकता मंच, कामगार एकता, स्वतंत्र फेडरेशन आदी २० हून अधिक संघटना या आंदोलनात एकवटल्या आहेत.
संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका करताना म्हटले की, “कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार कठोर व निगरगट्ट भूमिका घेत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला संसदेतून जागे करावे लागेल.”
कामगार कायद्यांबाबत तीव्र नाराजी-
कामगार संघटनांच्या मते, केंद्र सरकारने २९ जुने कामगार कायदे रद्द करून चार कामगार संहिता लागू केल्याने कामगार वर्ग अडचणीत सापडला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एनटीसीच्या २३ हून अधिक गिरण्या गेली पाच वर्षे बंद असून, हजारो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सांगितले की, “शंभर वर्षांच्या लढ्यातून मिळविलेले कामगारहिताचे कायदे रद्द करून केंद्र सरकारने कामगारांचे भविष्य अंधारात ढकलले आहे.”
कोण सहभागी होणार?
या बंदमध्ये बँक कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, फेरीवाले, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बस-रिक्षा-टॅक्सी चालक, तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. आंदोलन शांततेत पार पडेल, असेही सांगण्यात आले आहे.
काय बंद, काय सुरू?
- बंद राहण्याची शक्यता -
- सार्वजनिक वाहतूक
- बँकिंग व विमा सेवा
- सरकारी कार्यालये
- बाजारपेठा व दुकाने
- शाळा व महाविद्यालये
- सुरू राहणाऱ्या सेवा :
- रुग्णालये व आरोग्य सेवा
- औषधांची दुकाने
- रुग्णवाहिका सेवा
- दूध व भाजीपाला पुरवठा
- अग्निशमन व आपत्कालीन सेवा
- वीज व पाणीपुरवठा
महाराष्ट्र काँग्रेसचा पाठिंबा-
दरम्यान, ‘भारत बंद’ला महाराष्ट्र काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारचे धोरण शेतकरी व कामगारविरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेसने या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली.
देशभरात आज होणाऱ्या या बंदकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याचा जनजीवनावर कितपत परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.