उपचाराच्या नावाखाली नवजात बालिकेची विक्री; डॉक्टरसह पाच जणांवर कारवाई

    12-Feb-2026
Total Views |
 
newborn baby girl
 Image Source:(Internet)
भंडारा :
दहा दिवसांच्या नवजात मुलीला (Newborn baby girl) उपचारासाठी नागपूरला नेत असल्याचे सांगून तिला दीड लाख रुपयांत विकल्याचा गंभीर प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गोंदिया येथील एका डॉक्टर असल्याचा आरोप असून एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी फरार आहेत.
 
२ फेब्रुवारी रोजी महिला व बाल विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर अज्ञात व्यक्तीकडून मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथे एका महिलेच्या घरी नवजात बालिका असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर विभागाच्या पथकाने संबंधित घराची पाहणी केली असता दहा दिवसांची बालिका आढळली. संबंधित महिलेने मुलगी गोंदियाहून आणल्याचे सांगितले.
 
३ फेब्रुवारीला पुढील चौकशीसाठी तिला विभागाकडे बोलावण्यात आले होते; मात्र ती हजर न राहिल्याने पोलिसांना कळविण्यात आले. वरठी पोलिसांनी तातडीने कारवाई करत शोधमोहीम राबवली. नाकाबंदी दरम्यान कुशारी फाट्यावर एक चारचाकी वाहन अडवण्यात आले. त्या वाहनात पूर्णिमा धुर्वे या महिला बालिकेसह आढळल्या. बालिकेच्या कायदेशीर पालकांविषयी विचारले असता त्या समाधानकारक माहिती देऊ शकल्या नाहीत. गोंदियातील डॉक्टरांच्या सांगण्यावरून बालिकेला नेत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीचा यात सहभाग असल्याचा आरोप गंभीर मानला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.