Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या आर्थिक अडचणींमुळे चर्चेत आला आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याने सुमारे पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही आणि त्याचा आर्थिक फटका राजपाल यांना बसला. कालांतराने व्याजासह ही रक्कम वाढत जाऊन सध्या सुमारे नऊ कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने त्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत असून तो सध्या तुरुंगात असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, राजपाल यादवने गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘भूल भुलैया’ फ्रँचायझीपासून ते अक्षय कुमार, सलमान खान आणि वरुण धवनसारख्या कलाकारांसोबत तो झळकला आहे. तरीही त्याच्या अनुभवाच्या तुलनेत मिळणारे मानधन तुलनेने कमी असल्याची चर्चा आहे.
उदाहरणार्थ, वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटासाठी वरुणला सुमारे २५ कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगितले जाते, तर त्याच चित्रपटात काम करणाऱ्या राजपाल यादवला केवळ एक कोटी रुपये मिळाले. २०२३ ते २०२५ या कालावधीत त्याने ‘कटहल’साठी एक कोटी, ‘ड्रीम गर्ल २’साठी एक कोटी, ‘भूल भुलैया ३’साठी दोन ते तीन कोटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी दोन कोटी रुपये इतके मानधन घेतल्याची माहिती आहे. गेल्या चार-पाच चित्रपटांमधून त्याची एकूण कमाई सुमारे सात ते आठ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे म्हटले जाते.
चालू वर्षातही राजपाल यादव अनेक प्रकल्पांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारसोबतचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होणार असून ‘वेलकम टू जंगल’मध्येही तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असतानाही राजपाल यादव आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा उभारी घेईल, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.