पंतप्रधान मोदींकडून १३ फेब्रुवारीला नव्या PMO ‘सेवा तीर्थ’चे उद्घाटन

    12-Feb-2026
Total Views |
 
PMO Seva Tirtha
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत उभारण्यात आलेल्या नव्या पंतप्रधान कार्यालय संकुल ‘सेवा तीर्थ’(Seva Tirtha) चे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटन समारंभ दुपारी १.३० वाजता होणार असून याच वेळी ‘कर्तव्य भवन-१’ आणि ‘कर्तव्य भवन-२’ही राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहेत.
 
महत्त्वाच्या मंत्रालयांना मिळणार नवे ठिकाण-
नव्या विकसित कर्तव्य भवनांमध्ये केंद्र सरकारची अनेक महत्त्वाची मंत्रालये स्थलांतरित होणार आहेत. यामध्ये वित्त मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय तसेच इतर प्रमुख विभागांचा समावेश आहे.
 
‘सेवा तीर्थ’ संकुलात केवळ पंतप्रधान कार्यालयच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) आणि कॅबिनेट सचिवालयाचे कार्यालयही असणार आहे. ही संपूर्ण योजना सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग मानली जाते.
 
प्रशासनिक रचनेत मोठा बदल-
पंतप्रधान कार्यालयाकडून जारी अधिकृत निवेदनानुसार, हे नवे संकुल भारताच्या प्रशासन व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण बदलाचे प्रतीक आहे. प्रशासन अधिक कार्यक्षम, आधुनिक, तंत्रज्ञान-सक्षम आणि नागरिक-केंद्रित करण्याचा यामागील उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
गेल्या अनेक दशकांपासून विविध मंत्रालये जुन्या व वेगवेगळ्या इमारतींमध्ये कार्यरत होती. त्यामुळे समन्वयाचा अभाव, वाढता देखभाल खर्च आणि कामकाजातील अडथळे यांसारख्या समस्या निर्माण होत होत्या. एकात्मिक इमारतींमुळे या सर्व अडचणींवर मात होईल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.
 
‘सेवा तीर्थ’ नावामागील विचार-
या प्रकल्पाचे सुरुवातीचे नाव ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’ असे होते. मात्र डिसेंबर २०२५ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचे नामकरण ‘सेवा तीर्थ’ असे करण्यात येत असल्याची घोषणा केली होती.
 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर त्यांनी म्हटले होते की, मागील ११ वर्षांत मोदी सरकारची राजकारणाची भूमिका सत्ता नव्हे, तर सेवेला प्राधान्य देणारी राहिली आहे. पंतप्रधान कार्यालयाला ‘सेवा तीर्थ’ हे नाव देणे ही त्याच विचारसरणीची अभिव्यक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
 
२४x७ प्रशासनाच्या दिशेने पाऊल-
सरकारच्या मते, हे नवे कार्यालय संकुल ‘राउंड-द-क्लॉक’ गव्हर्नन्स मॉडेल अधिक बळकट करेल आणि मंत्रालयांमधील समन्वय वाढवेल. भविष्यातील प्रशासनिक गरजा लक्षात घेऊन या संकुलाची रचना करण्यात आल्याचेही अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.