एअर इंडिया दुर्घटनेवर नवा संशय; इंधन स्विच मानवी हस्तक्षेपाने बंद?

    12-Feb-2026
Total Views |
 
Air India crash
 Image Source:(Internet)
अहमदाबाद :
गेल्या वर्षी १२ जून रोजी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) घडलेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत एक नवा दावा समोर आला आहे. इटलीतील प्रमुख दैनिक ‘कोरिएरे डेला सेरा’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, विमान कोसळण्यामागे पायलटने जाणूनबुजून इंधनाचा स्विच बंद केल्याची शक्यता तपासात सूचित करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, भारतीय अधिकृत यंत्रणांनी या वृत्ताची कोणतीही पुष्टी केलेली नाही.
 
अहवालातील दावे काय?
इटालियन वृत्तपत्राने पश्चिमेकडील विमान वाहतूक क्षेत्रातील सूत्रांचा हवाला देत असा दावा केला आहे की, अंतिम तपास अहवालात पायलटच्या कृतीचा उल्लेख असू शकतो. तपासादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील संभाषणाचा संदर्भ देत अहवालात म्हटले आहे की, एका पायलटने दुसऱ्याला “इंजिन का बंद केले?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर “मी इंजिन बंद केले नाही,” असे उत्तर देण्यात आल्याची नोंद आहे. या संवादावरून मानवी हस्तक्षेपाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट नाही-
एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि नागरी उड्डयन मंत्रालयाने या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हे वृत्त केवळ माध्यमांतून समोर आलेले दावे मानले जात आहेत.
 
संशयाची सुई कुणाकडे?
सदर अहवालात विमानाचे कमांडर कॅप्टन सुमित सभरवाल यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, भारतीय पायलट संघटनांनी आणि कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळले असून, अपघाताची जबाबदारी वैमानिकांवर टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी विमान निर्माता कंपनी, एअरलाइन व्यवस्थापन आणि तांत्रिक बाबींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 
तपासाची प्रगती-
डिसेंबरमध्ये भारतीय तपास पथकाने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे जाऊन ब्लॅक बॉक्समधील डेटा तपासला होता. विशेषतः कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, आधी डाव्या इंजिनचे कार्य थांबले आणि त्यानंतर उजवे इंजिन बंद पडले.
 
विमानतज्ज्ञांच्या मते, बोईंग ७८७ ड्रीमलाइनरमधील दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद होणे अत्यंत अपवादात्मक आहे. अशी घटना केवळ गंभीर तांत्रिक बिघाडामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळेच घडू शकते.
 
अपघाताची भीषणता-
१२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या अर्ध्या मिनिटात हे विमान कोसळले. मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर आदळलेल्या या विमान दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. विमानातील २४२ पैकी २४१ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर जमिनीवरील १९ जणांचाही बळी गेला.
 
अंतिम तपास अहवाल जाहीर होईपर्यंत कोणताही ठोस निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या दुर्घटनेमुळे विमान सुरक्षेबाबतच्या प्रक्रियांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.