Image Source:(Internet)
नांदेड :
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज दुपारी भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुखेड तालुक्यातील सुमारे सात ते आठ गावांमध्ये दुपारी अंदाजे ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास जमिनीतून गूढ आवाज येत असल्याचा आणि जमीन हलल्याचा अनुभव ग्रामस्थांनी सांगितला.
हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेड, धनज तसेच परिसरातील इतर काही गावांमध्ये हे धक्के जाणवले. अचानक झालेल्या आवाजामुळे अनेकांनी घराबाहेर धाव घेत मोकळ्या जागेत आश्रय घेतला. काही वेळ गावांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण होते.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.० इतकी नोंदवण्यात आली आहे. मुखेड तालुक्यातील खपराळा परिसर हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही.
जमिनीतून गूढ आवाज का येतो?
भूकंप तज्ज्ञांच्या मते, जमिनीखालील खडकांच्या थरांमध्ये दीर्घकाळ ताण साचत जातो. हा ताण अचानक सुटल्यास ऊर्जा मुक्त होते आणि त्यातून कंपने निर्माण होतात. या प्रक्रियेदरम्यान जमिनीखालून गडगडाटासारखा आवाज ऐकू येऊ शकतो.
काही प्रकरणांमध्ये पावसाचे पाणी खोल भेगांमधून आत जाऊन तापलेल्या खडकांच्या संपर्कात आल्याने वाफ तयार होते. या वाफेचा दाब अचानक सुटल्यासही आवाज निर्माण होऊ शकतो. तसेच जमिनीखालील नैसर्गिक पोकळ्यांमध्ये अडकलेली हवा बाहेर पडतानाही गूढ आवाज ऐकू येण्याची शक्यता असते.
यापूर्वीही धक्के-
याआधी पालघर जिल्ह्यात सौम्य धक्के जाणवले होते. जानेवारी महिन्यात पंढरपूर परिसरातही जमिनीतून मोठा आवाज आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
तज्ज्ञांच्या मते, ३.० तीव्रतेचा भूकंप साधारणपणे सौम्य स्वरूपाचा मानला जातो. मात्र अशा घटना वारंवार घडत असल्यास प्रशासनाने सतर्क राहून स्थानिक नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.