Image Source:(Internet)
मुंबई :
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचे औपचारिक आमंत्रण दिले. या भेटीमुळे अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
सचिनसोबत पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगा अर्जुन, मुलगी सारा आणि अर्जुनची होणारी पत्नी सानिया चांडोक उपस्थित होती. पंतप्रधान मोदींनी या तरुण जोडप्याला आशीर्वाद देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्जुन आणि सानियाच्या लग्न समारंभाला आमंत्रित करण्याचा आम्हाला आनंद झाला. तरुण जोडप्याला दिलेल्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाबद्दल मोदीजींचे मनःपूर्वक आभार,” असे सचिन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकर यांनी यापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही 10 जनपथ येथे भेट घेतल्याची माहिती आहे. त्यांनाही अर्जुनच्या विवाहाचे निमंत्रण देण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे अर्जुनच्या लग्नसोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सानिया चांडोक कोण?
अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा सानिया चांडोकशी खाजगी समारंभात पार पडला. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि फूड व्यवसायात अग्रगण्य मानले जाते. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ‘ब्रुकलिन क्रीमरी’ या लोकप्रिय ब्रँडशी त्यांचा संबंध आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला कुटुंबीय आणि निकटवर्तीय उपस्थित होते.
क्रिकेट कारकीर्दीकडेही लक्ष
अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये तो यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला असून, आगामी हंगामात तो लखनऊ संघाकडून खेळताना दिसणार आहे.
शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास, अर्जुनने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली.
एकीकडे क्रिकेट कारकीर्द आणि दुसरीकडे वैवाहिक आयुष्याची नवी सुरुवात—अर्जुन तेंडुलकरसाठी हे वर्ष विशेष ठरणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.