महाराष्ट्रात ७० हजार सरकारी पदांची भरती; आचारसंहितेनंतर प्रक्रिया गतीमान

    11-Feb-2026
Total Views |
 
CM Fadnavis
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रशासनातील रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल ७० हजार पदांची मोठी भरती (Recruitment) मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
राज्यातील विविध विभागांमध्ये अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने टप्प्याटप्प्याने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील सुमारे ११ हजार रिक्त प्राध्यापक पदांपैकी पहिल्या टप्प्यात ५,५०० पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांच्या मुख्य कॅम्पसमधील सुमारे ७०० प्राध्यापक पदेही भरली जाणार आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी ही भरती राबवली जात आहे. एकूण ७० हजार पदांपैकी सुमारे २० हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये राजपत्रित तसेच अराजपत्रित पदांचा समावेश असेल. गृह, महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद आणि इतर विभागांमध्येही मोठ्या प्रमाणावर भरती अपेक्षित आहे.
 
भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. येत्या काही आठवड्यांत संबंधित विभागांकडून अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुणांसाठी ही भरती मोहीम रोजगाराच्या दृष्टीने मोठी संधी मानली जात आहे.