ओला-उबर-रॅपिडो उद्या देशभर बंद? कॅब चालकांचा ‘ऑल इंडिया ब्रेकडाउन’चा इशारा

    11-Feb-2026
Total Views |
 
All India breakdown
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
ओला (Ola), उबर आणि रॅपिडोसारख्या अॅप-आधारित कॅब सेवांवर उद्या (शनिवार, ७ फेब्रुवारी) मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरातील कॅब चालकांनी एकदिवसीय संपाची घोषणा केली असून या आंदोलनाला “ऑल इंडिया ब्रेकडाउन” असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना कॅब, ऑटो किंवा बाईक टॅक्सी सेवा मर्यादित प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
 
तेलंगणा गिग वर्कर्स युनियन (TGPWU) आणि इतर काही संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून हा संप पुकारण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी चालक अॅप्सवर लॉग-इन न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था ठेवावी, असा सल्ला दिला जात आहे.
 
चालकांच्या म्हणण्यानुसार अॅप कंपन्यांकडून भाडे दर आणि कमिशनबाबत स्पष्ट धोरण नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढते इंधन दर, कमिशन कपात आणि अनिश्चित उत्पन्न यामुळे चालकांमध्ये नाराजी वाढली आहे. तसेच सुरक्षितता आणि कामाच्या अटींबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
 
या संदर्भात संघटनांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. सरकारने किमान भाडे दर निश्चित करून चालकांच्या हिताचे धोरण जाहीर करावे, अशी त्यांची मागणी आहे.
 
देशव्यापी संप यशस्वी ठरल्यास महानगरांसह प्रमुख शहरांतील वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बँक कर्मचाऱ्यांनीही देशव्यापी संप केला होता. आता गिग वर्कर्सच्या आंदोलनामुळे सेवा क्षेत्रात पुन्हा एकदा असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.