Image Source:(Internet)
मुंबई :
बृहन्मुंबई महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील मंत्रीमंडळ सदस्य उपस्थित असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक आमनेसामने आले. जोरदार घोषणाबाजी आणि ‘५० खोके’च्या आरोळ्यांमध्येच निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
तब्बल चार दशकांनंतर मुंबईच्या महापौरपदी भाजपचा चेहरा विराजमान झाला आहे. रितू तावडे यांची महापौर म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. दोन्ही पदांसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक औपचारिक ठरली.
बुधवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या प्रक्रियेदरम्यान महायुतीच्या सदस्यांनी जल्लोष करत टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र विरोधी बाकांवरून तीव्र घोषणाबाजी सुरू होती. “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणांमुळे वातावरण अधिक तापले. सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तरादाखल जोरदार घोषणा देत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.
पेडणेकरांचा आक्षेप, प्रशासनाचा नियमांचा दाखला
निवडणुकीच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सात वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना जबाबदारी न देणे ही परंपरेची पायमल्ली असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या भूमिकेला त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा देत निषेध व्यक्त केला. मात्र आयुक्त भूषण गगराणी यांनी नियमांनुसारच कारवाई झाल्याचे स्पष्ट करत आक्षेप फेटाळला.
सभागृह घोषणांनी दुमदुमले
सभागृहात “जय श्रीराम”, “महायुतीचा विजय असो”, “देवाभाऊ आगे बढो” अशा घोषणा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत होत्या. तर विरोधकांकडून “उद्धव ठाकरे जिंदाबाद”, “शिवसेनेचा विजय असो” अशा आरोळ्या दिल्या जात होत्या. दोन्ही गटांच्या घोषणांमुळे काही काळ कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
फडणवीसांची प्रतिक्रिया
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईत महायुतीची सत्ता स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त केला. “मुंबई महापालिकेचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेल्या स्वप्नातील मुंबई साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांना पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार हवा आहे,” असे ते म्हणाले.
मुंबई महापालिकेतील नव्या सत्तासमीकरणानंतर आगामी काळात प्रशासनाच्या प्राधान्यक्रमात कोणते बदल होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.