Image Source:(Internet)
छत्रपती संभाजीनगर :
बारावी परीक्षेच्या (12th exam) सुरुवातीलाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सामूहिक कॉपीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी उघडपणे एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लेखन केल्याचे आढळले. या गैरप्रकाराला काही शिक्षकांचेही पाठबळ असल्याचे ‘सीसीटीव्ही’ तपासणीत स्पष्ट झाले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांतील ४५४ केंद्रांवरून १ लाख ९० हजार ५९२ विद्यार्थी, तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यांतील २५३ केंद्रांवरून ९६ हजार ४९६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. अशा पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी उघड झालेल्या या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर आणि विस्तार अधिकारी सिताराम पवार यांच्या भरारी पथकाने अचानक भेट दिली असता केंद्रावर संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पडताळणी करण्यात आली. तपासात विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित असल्याचे, एका बाकावर दोन विद्यार्थी बसवले असल्याचे, तसेच काही विद्यार्थी उभे राहून उत्तर लिहित असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व प्रकारात केंद्रावरील काही शिक्षकांचा सहभाग असल्याचेही निदर्शनास आले.
या घटनेनंतर शिक्षण विभागाने केंद्र संचालकांसह एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेमधील पर्यवेक्षक शिक्षक व बैठे पथकातील अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. इतर संबंधित कर्मचाऱ्यांवर त्यांच्या संस्थेमार्फत शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन संपूर्ण परीक्षा केंद्राचा स्टाफ तत्काळ बदलण्यात आला आहे. केंद्रप्रमुखांसह १४ कर्मचारी आणि दोन सहाय्यक अशा १७ जणांची बदली करून नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरून पुढील सर्व पेपर नियमबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडतील.
सदर केंद्रावर १४ परीक्षा कक्ष असून एकूण ३३४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. इंग्रजीच्या पेपरसाठी ३२७ विद्यार्थी उपस्थित होते, तर सात विद्यार्थी अनुपस्थित होते.
“भरारी पथकाच्या भेटीत कॉपीचा प्रकार उघडकीस आला. ‘सीसीटीव्ही’ तपासणीनंतर संपूर्ण बाब स्पष्ट झाली. संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे,” असे शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थापनात झालेली ही मोठी कारवाई मानली जात असून शिक्षण व्यवस्थेतील शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.