भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर; महायुतीचा पालिकेवर झेंडा; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

    11-Feb-2026
Total Views |
 
Ritu Tawde
Image Source:(Internet) 
मुंबई :
राज्यभराचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपच्या रितू तावडे (Ritu Tawde) विराजमान झाल्या आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते आज दोघांचा अधिकृत पदग्रहण सोहळा पार पडला. सभागृहात घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात महायुतीच्या सदस्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.
 
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पदग्रहणानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी नव्या महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करत महायुतीच्या विजयाला मुंबईकरांच्या विश्वासाची पावती असल्याचे म्हटले.
 
“मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेना-भाजप महायुतीचा महापौर आणि उपमहापौर विराजमान झाला, याचा आनंद आहे. रितू तावडे आणि संजय घाडी हे दोघेही महायुतीचे सक्षम शिलेदार आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
 
मुंबईकरांना लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. जनतेच्या कौलाला साजेसे काम करण्याची ही सुरुवात आहे, असे सांगत त्यांनी रितू तावडे यांना “अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा” अशी विशेषणं दिली. “मागील काळात त्यांनी मुंबईकरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या मुंबई विकासाच्या कार्यक्रमाला पालिकेच्या माध्यमातून अधिक गती दिली जाईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
उपमहापौर संजय घाडी यांच्या अनुभवाचाही पालिकेला निश्चितच फायदा होईल, असे नमूद करत फडणवीस म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अपेक्षित असलेले प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
 
महापौर, उपमहापौर आणि सर्व पदाधिकारी मिळून मुंबई महापालिकेला नवी दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची स्वप्ने पूर्ण करतील, असे आश्वासन देत “मी आणि एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू. नव्या मुंबईला अधिक वेग देण्याचे काम या नेतृत्वातून होईल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.