शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा; उपचार सुरूच, पंतप्रधान मोदींची फोनवरून चौकशी

    10-Feb-2026
Total Views |
 
Sharad Pawar
Image Source:(Internet) 
पुणे:
राष्ट्वादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे काल सायंकाळी त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आलं होतं. सध्या डॉक्टरांच्या कडक निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
बारामतीत असताना डॉक्टरांच्या पथकाने दोन वेळा गोविंदबाग येथे जाऊन शरद पवार यांची तपासणी केली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
 
रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर सायमन ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर आवश्यक उपचार करण्यात आले असून पवार यांना होत असलेला त्रास आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे, मात्र पुढील काही काळ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
 
रुग्णालय प्रशासनाने कार्यकर्ते आणि हितचिंतकांना हॉस्पिटल परिसरात गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. रुग्णालयाच्या नियमांनुसार उपचार सुरू असून प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
 
पंतप्रधानांची विचारपूस-
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याची माहिती आहे. पंतप्रधानांनी पवार यांच्याशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीबाबत जाणून घेतलं आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
सुप्रिया सुळे यांची माहिती-
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांच्यावर पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू आहे. इतर सर्व तपासण्या सामान्य आल्या आहेत. सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद,” असं त्यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून परिस्थिती अनुकूल राहिल्यास आज संध्याकाळी किंवा उद्या त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.