Image Source:(Internet)
नागपूर :
मानवी तस्करी व संघटित लैंगिक शोषणाविरोधात राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन शक्ती’ (Operation Shakti) अंतर्गत नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) पाचपावली परिसरात धडक कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत देहव्यापारासाठी महिलांना जबरदस्तीने वापरणाऱ्या दाम्पत्याला अटक करण्यात आली असून, दोन पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.४० ते रात्री ९.३० या कालावधीत ही कारवाई राबविण्यात आली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपाजवळ, राणी दुर्गावती चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर सार्वजनिक ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत अॅक्टिव्हा 6G स्कूटरवर येणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख तौसिफ नियाज कुरेशी (वय २६) आणि झोया तौसिफ कुरेशी उर्फ मखानी राम मिश्रा, रा. पंचशील नगर, पाचपावली अशी झाली आहे. चौकशीत त्यांनी उप्पलवाडी येथील कोमल नितीन पवार हिच्या मदतीने हा अवैध धंदा चालवत असल्याची कबुली दिली आहे.
तपासात आरोपी महिलांसाठी ठिकाणे निश्चित करून आर्थिक लाभासाठी त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलत असल्याचे उघड झाले. या कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून अॅक्टिव्हा 6G स्कूटर (MH-49-BQ-0782), विविध कंपन्यांचे सहा मोबाईल फोन, ४,५०० रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण सुमारे १.०४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३(२) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ मधील कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, उपायुक्त (डिटेक्शन) राहुल मणिकर, सहायक पोलीस आयुक्त (क्राईम ब्रँच) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU अधिकारी ललिता तोडसे व त्यांच्या पथकाने केली.