एआयद्वारे तयार होणाऱ्या कंटेंटसाठी नवे नियम जाहीर; २० फेब्रुवारी २०२६ पासून बंधनकारक अंमलबजावणी

    10-Feb-2026
Total Views |

AI contentImage Source:(Internet) 
नवी दिल्ली:
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार होणाऱ्या कंटेंटबाबत केंद्र सरकारने नवे नियम अधिकृतपणे जाहीर केले आहेत. हे नियम प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल कंपन्यांवर लागू होणार आहेत. २० फेब्रुवारी २०२६ पासून एआय टूल्सद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रत्येक कंटेंटवर तो ‘AI-जनरेटेड’ असल्याचे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक असणार आहे.
 
अलीकडच्या काळात इंटरनेटवर डीपफेक व्हिडिओ, बनावट फोटो आणि खोट्या ऑडिओ क्लिप्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य वापरकर्त्यांसाठी खरे आणि खोटे यात फरक करणे कठीण झाले आहे. अशा प्रकारच्या कंटेंटमुळे चुकीची माहिती पसरत असून फसवणूक, मानहानी आणि सामाजिक गोंधळ वाढत असल्याचे सरकारचे मत आहे. या पार्श्वभूमीवर हे नवे नियम लागू करण्यात येत आहेत.
 
सरकारने ‘सिंथेटिक कंटेंट’ची स्पष्ट व्याख्याही दिली आहे. संगणक किंवा अल्गोरिदमच्या मदतीने तयार करण्यात आलेले असे ऑडिओ, व्हिडिओ, फोटो किंवा दृश्य, जे खरे वाटावेत आणि लोकांची दिशाभूल करू शकतात, ते या श्रेणीत येतील. एखाद्या व्यक्ती किंवा घटनेचे चुकीचे, भ्रामक चित्रण करणारा कंटेंटही सिंथेटिक कंटेंट म्हणून गणला जाणार आहे.
 
मात्र, सामान्य संपादन, रंगसुधारणा (कलर करेक्शन), भाषांतर किंवा दस्तऐवज तयार करणे यांसारख्या नियमित डिजिटल प्रक्रिया, जर त्या खोटा किंवा दिशाभूल करणारा मजकूर निर्माण करत नसतील, तर त्या सिंथेटिक कंटेंटच्या कक्षेत येणार नाहीत, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
 
या नव्या नियमांमुळे डिजिटल विश्वात पारदर्शकता वाढेल आणि चुकीच्या माहितीवर आळा बसण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.