Image Source:(Internet)
मुंबई :
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे यांची प्रकृती स्थिर असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असून पुढील उपचारांचा निर्णय तपासणीनंतर घेतला जाणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी सार्वजनिक सभेत राजकारणातून निवृत्त होण्याबाबत सूचक विधान केले होते. “आता आपण किती करणार…” असे म्हणत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी दोन्ही मुले कर्तृत्ववान असल्याचे सांगत, त्यांना आनंदी आणि यशस्वी आयुष्य लाभो, असा आशीर्वादही त्यांनी दिला होता.
नारायण राणे यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी इच्छा समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.