‘अजित पवार यांचा अपघात नाही, १०० टक्के घातपात’; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

    10-Feb-2026
Total Views |
 
Rohit Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई:
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मोठा आणि गंभीर दावा केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “हा केवळ अपघात नसून नियोजित घातपात आहे, याबाबत मला १०० टक्के शंका आहे.”
 
रोहित पवार यांनी अपघाताच्या आदल्या दिवसातील घटनाक्रम सविस्तरपणे मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, २७ जानेवारी रोजी अजित पवार संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला जाणार होते. ताफाही तयार होता. मात्र अचानक त्यांचा दौरा बदलला गेला. अपघात मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जानेवारी रोजी झाला.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांनी काही अधिकाऱ्यांना आणि पक्षातील नेत्यांना भेटण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर संध्याकाळी पुण्याला रवाना होण्याचा त्यांचा विचार होता. मात्र एका “मोठ्या नेत्याच्या” भेटीला उशीर झाल्याने चर्चा लांबली आणि वेळ निघून गेला. त्यामुळे गाडीने जाणे शक्य न राहता दुसऱ्या दिवसासाठी सकाळी ७ वाजून १३ मिनिटांचे विमान बुक करावे लागले, असा दावा रोहित पवार यांनी केला.
 
रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की, अपघाताच्या आधी एका अत्यंत महत्त्वाच्या फाईलसाठी अचानक दबाव आणण्यात आला. ती फाईल घरी नसून मंत्रालयात असल्याचे लक्षात आल्यानंतर ती मागवण्यात आली आणि सही होईपर्यंत बराच वेळ गेला. “अजित पवार कधीही काम प्रलंबित ठेवत नसत, पण त्या दिवशी अचानक सगळी साखळी वेगळीच घडली,” असे त्यांनी नमूद केले.
 
यासोबतच, रोहित पवार यांनी अजित पवार आणि काही अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या गोपनीय चर्चांचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, शेकडो कोटींच्या एका राजकीय कन्सल्टंटचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याबाबत चर्चा सुरू होती. या निर्णयामुळे काही शक्ती अस्वस्थ झाल्या असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अपघाताच्या अवघ्या काही दिवस आधी बारामतीत झालेल्या भेटीत अजित पवारांनी “राजकारण आम्हाला शिकवू नका” असा ठाम पवित्रा घेतल्याचेही रोहित पवार म्हणाले.
 
रोहित पवार यांनी मांडलेली घातपाताची संशयास्पद कारणे:
  • अजित पवारांचा दौरा अचानक बदलणे, विमानाची वेळ आणि पायलट बदलणे
  • केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल व ATC ट्रान्सक्रिप्टमधील वेळेच्या विसंगती
  • फ्लाइट रडारचा डेटा अपघाताच्या एक मिनिट आधी बंद पडणे
  • Visibility कमी असतानाही लँडिंगचा निर्णय
  • Runway 11 वरच उतरवण्याचा आग्रह
  • अपघातापूर्वी विमान कमी उंचीवर आणले जाणे
  • शेवटच्या काही मिनिटांत पायलटकडून कोणताही संवाद न होणे
 “या सगळ्या घटनांची सखोल आणि स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. सत्य बाहेर येणे हे फक्त कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे आहे,” अशी ठाम मागणी रोहित पवार यांनी केली आहे.