
Image Source:(Internet)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ब्रॉन्कायटिस आणि छातीतील संसर्गामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांना शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून आता पुढील उपचार घरच्या घरीच सुरू ठेवण्यात येणार आहेत.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर डॉ. प्रीतम समदानी यांनी सांगितले की, पवार यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. औषधोपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वय लक्षात घेता नियमित औषधे घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
छातीतील संसर्गावर उपचार; प्रकृतीत सुधारणा-
८५ वर्षीय शरद पवार यांना ब्रॉन्कायटिस आणि छातीतील संसर्गाचा त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. घरी विश्रांती घेण्यासह औषधोपचार नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना वैद्यकीय पथकाने दिल्या आहेत.
पुण्यातून मुंबईत हलवण्यात आले होते-
शरद पवार यांना सुरुवातीला २ नोव्हेंबर रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्याच दिवशी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट-
शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी पवार यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. त्यांचे वैद्यकीय अहवालही सामान्य असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचे पुढील उपचार आणि विश्रांती घरीच सुरू राहणार आहे.