
Image Source:(Internet)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला असतानाच मुंबईतील सिल्व्हर ओक येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सिल्व्हर ओक येथे हजेरी लावली.
यामध्ये जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते पार्थ पवार हेदेखील शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यातच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही विलिनीकरणाबाबत महत्त्वाचा दावा केला होता.
'अजित पवार असते तर १२ फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाले असते. याबाबत त्यांनी मला कल्पना दिली होती,' असे तटकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आता पार्थ पवार यांच्या सिल्व्हर ओक भेटीमुळे या चर्चांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या भेटींमागील नेमके कारण आणि विलिनीकरणाबाबत कोणताही अधिकृत निर्णय अद्याप समोर आलेला नाही.