नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात रॅगिंगचा संतापजनक प्रकार; दारूची बाटली फोडून विद्यार्थ्यांना काचा उचलायला लावल्या!

    05-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : महाविद्यालयात शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी आलेल्या नवख्या विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून कथित छळाचा सामना करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात दोन कनिष्ठ विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्याशी शिवीगाळ आणि जातिवाचक टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर दारूची बाटली फोडून तिच्या काचेच्या तुकड्यांची साफसफाई करण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडल्याची तक्रार करण्यात आली आहे. प्रवेश घेऊन अवघे १५ दिवस झाले असताना हा प्रकार घडल्याने महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरच्या सुमारास दोन कनिष्ठ विद्यार्थ्यांना वरिष्ठांनी एका ठिकाणी बोलावले. तेथे त्यांना शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. यावेळी जातिवाचक टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर दारूची रिकामी बाटली फोडून तिच्या काचा उचलण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. स्वतंत्र वसतिगृह व्यवस्था असतानाही कनिष्ठ विद्यार्थ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याने वसतिगृहातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रशासनाची धावपळ; रॅगिंगविरोधी समितीकडून चौकशी
घटनेची माहिती मिळताच महाविद्यालय प्रशासनाने रॅगिंगविरोधी समितीची बैठक घेतली. संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, तक्रारदार विद्यार्थ्यांच्या पालकांनाही ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. याशिवाय अजनी पोलिसांनाही घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आरोपांचे सत्य आणि घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

दिवाळीच्या सुट्यांमुळे चौकशीला विलंब
दरम्यान, दिवाळीच्या सुट्यांमुळे वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी गावी गेल्याने संबंधितांचे जबाब नोंदविण्यात अडचणी येत आहेत. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडणाईक हेही रजेवर असल्याने पुढील निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर होणार असून, त्यानंतर रॅगिंगविरोधी समितीची पुन्हा बैठक होणार आहे.

महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधात कठोर नियम आणि स्वतंत्र समित्या असतानाही नवख्या विद्यार्थ्यांना अशा अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची आणि या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.