अमरावतीत सोन्याची मिठाई चर्चेत! २४ कॅरेट सोन्याचा वर्ख, किलोसाठी मोजावे लागणार २४ हजार रुपये

    05-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अमरावती : दिवाळीच्या फराळात मिठाईला विशेष महत्त्व असते. मात्र, अमरावतीत सध्या एका खास मिठाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मिठाईचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यावर चक्क २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. ‘स्वर्ण शंख’ असे या मिठाईचे नाव असून, तिचा प्रतिकिलो दर तब्बल २४ हजार रुपये आहे. त्यामुळे या शाही मिठाईची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

या महागड्या मिठाईच्या निर्मितीसाठी उच्च प्रतीचे मामरा बदाम, पिसोरी पिस्ता आणि शुद्ध केशराचा वापर करण्यात आला आहे. त्यावर सोन्याचा वर्ख चढवून मिठाईला आकर्षक रूप देण्यात आले आहे. राजस्थानमधील कुशल कारागिरांनी विशेष मेहनतीतून ही मिठाई तयार केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारच्या मिठायांची रेलचेल असताना ‘स्वर्ण शंख’ने मात्र आपल्या विक्रमी किमतीमुळे वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य मिठाईच्या तुलनेत कितीतरी महाग असलेल्या या मिठाईची खरेदी करणे अनेकांसाठी विशेष बाब ठरत आहे. त्यामुळे दिवाळीत गोडवा वाढवण्यासाठी आता खिशालाही सोन्याचा भाव मोजावा लागणार असल्याचे चित्र आहे.