राहुल गांधी, मैदानात उतरण्याची भाषा करू नका अन्यथा...;नागपुरात फडणवीसांचा एल्गार

    05-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : निवडणूक आयोग आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून भाजपला घेरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका घेतली, तर भाजपही त्यांना जशास तसे उत्तर देईल, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतला. ‘तुम्ही लाखभर लोक रस्त्यावर आणले, तर आम्ही कोटींच्या संख्येने उतरू,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

नागपुरात भाजपच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ महापदयात्रेत ते बोलत होते. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR), मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते केंद्र सरकारवर सातत्याने आरोप करत आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने नागपुरात मोठे शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसवर घटनात्मक संस्थांना लक्ष्य करून त्यांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. देशाचे संविधान सर्वोच्च असून, त्याच घटनात्मक चौकटीत राजकीय लढाई लढली जाईल. मात्र, विरोधकांनी रस्त्यावर संघर्ष सुरू केला तर भाजपही मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘विरोधकांनी शंभर लोक आणले तर आम्ही हजारोंनी उतरू, त्यांनी हजार आणले तर आम्ही लाखोंनी येऊ आणि त्यांनी लाखभर लोक जमवले तर आम्ही एक कोटींच्या संख्येने रस्त्यावर उतरू,’ असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

हा संघर्ष सत्तेसाठी किंवा एखाद्या राजकीय नेत्यासाठी नसून देशाचे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी असल्याचा दावाही त्यांनी केला. फडणवीस यांच्या या विधानामुळे नागपुरातील भाजपच्या महापदयात्रेला राजकीय संघर्षाची धार मिळाली असून, राहुल गांधी आणि काँग्रेस यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.