दुष्काळी अनुदानाचे ५ हजार रुपये बँकेने कर्ज खात्यात वळवले? शेतकऱ्याचा गंभीर आरोप

    05-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

जळगाव : शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा म्हणून जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी अनुदानाच्या रकमेलाच बँकेने हात घातल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दुष्काळी अनुदानाचे पाच हजार रुपये बँक खात्यात जमा झाल्यानंतर ते शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय थेट कर्ज खात्यात वर्ग करण्यात आल्याचा आरोप पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील शेतकरी आनंदा सिताराम पैठणकर यांनी केला आहे.

पैठणकर यांच्या बँक ऑफ बडोदा, सामनेर शाखेतील खात्यात ४ नोव्हेंबर रोजी शासनाकडून दुष्काळी अनुदानाचे पाच हजार रुपये जमा झाले होते. या रकमेचा उपयोग करण्यासाठी ते बँकेत गेले. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न करताच अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळती करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. पासबुकमध्ये अनुदान जमा झाल्याची नोंद असतानाही प्रत्यक्ष पैसे काढता येत नसल्याने त्यांनी बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.

यावेळी बँक अधिकाऱ्यांनी रक्कम कर्ज खात्यात जमा झाल्याचे सांगितल्याचा दावा पैठणकर यांनी केला. मात्र, या प्रकाराबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पैठणकर यांनी पाचोरा तहसीलदार विजय बनसोड यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार कथन केला. तहसीलदारांनी प्रकरणाची दखल घेत शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या मदतीची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग करण्याचा अधिकार बँकेला आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. आता प्रशासन बँकेच्या या कथित कारवाईची चौकशी करून काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.