तीन बळी घेणाऱ्या वाघाचा अखेर बंदोबस्त; चिंमूरमध्ये वनविभागाची मध्यरात्री धडक मोहीम!

    04-Nov-2026
Total Views |
 
Tiger
 Image Source:(Internet)
 
चंद्रपूर : तीन जणांचा जीव घेत चिंमूर वनपरिक्षेत्रात दहशत निर्माण करणाऱ्या वाघाला Tiger वनविभागाने अखेर पकडले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वनविभागाची पथके या वाघाच्या मागावर होती. मात्र, सतत ठिकाण बदलत असल्याने तो हाती लागत नव्हता. अखेर ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री गडगाव बीटमधील कक्ष क्रमांक ३८० येथे विशेष मोहीम राबवून त्याला बेशुद्ध करण्यात आले. वाघ पकडल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
 
सुमारे पाच वर्षे वयाच्या या वाघाने चिंमूर आणि ब्रह्मपुरी वनविभागाच्या हद्दीत तीन जणांवर प्राणघातक हल्ले केले होते. त्यामुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट होते. वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक तैनात केले होते. त्याच्या हालचालींचा मागोवा घेत योग्य संधीची प्रतीक्षा केली जात होती.
 
३ नोव्हेंबरच्या रात्री ११.४० वाजता रेस्क्यू टीमने वाघाला डार्ट मारले. बेशुद्ध झाल्यानंतर रात्री १२.१० वाजता त्याला स्ट्रेचरवर घेण्यात आले. वैद्यकीय तपासणी व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला ब्रह्मपुरी येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम आणि ब्रह्मपुरी वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेचा अखेर शेवट झाला.