Image Source:(Internet)
नागपूर : शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने मोठी कारवाई केली आहे. गणेशपेठ Ganeshpeth पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून एमडी ड्रग्जसदृश पावडरसह दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या तस्करीचे धागेदोरे आणखी दोघांपर्यंत पोहोचले असून त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपेठ परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अँटी नार्कोटिक्स पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी साखले गुरुजी शाळेमागील रस्त्यावर सापळा रचून छापा टाकला. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या शेख फैजान शेख असलम आणि अब्दुल अनीस या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघेही मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी आहेत.
झडतीदरम्यान आरोपींकडून सुमारे ७ ग्रॅम एमडी ड्रग्जसदृश पावडर जप्त करण्यात आली. तिची किंमत ७१ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय तीन मोबाईल फोन, एक अॅक्टिव्हा मोपेड आणि एक कारही पोलिसांनी जप्त केली. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख २६ हजार रुपये आहे.
दरम्यान, आरोपींच्या चौकशीत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या अमन इंगळे आणि संदीप कश्यप या दोघांची नावे समोर आली आहेत. हे दोघेही इमामवाडा परिसरातील रामबाग, मैत्री बुद्ध विहार भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मात्र, ते अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना पुढील तपासासाठी गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील एमडी ड्रग्ज तस्करीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.