
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील गोधनी Godhani रोडवर अपघातांची मालिका सुरूच असून, भरधाव टिप्परच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती पंकज फलके (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांचे लहान मूलही जखमी झाले. एकाच मार्गावर वारंवार जीवघेणे अपघात होत असल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्या आंदोलनामुळे सुमारे चार तास वाहतूक विस्कळीत झाली.
मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी रोडवर गारवा बिर्याणी सेंटरसमोर ही दुर्घटना घडली. ज्योती फलके या पती आणि मुलासह दुचाकीने जात असताना मागून आलेल्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेच्या जोरामुळे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी टिप्परचे चाक ज्योती यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
अपघाताची माहिती पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे स्थानिकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले. गोधनी रोडवरील खड्डे, सतत सुरू असलेली खोदकामे आणि रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून अतिक्रमण हटवावे, तसेच भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या मार्गावर अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही. सुमारे २० दिवसांपूर्वी याच रस्त्यावर झालेल्या दुर्घटनेत एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. वारंवार अपघात होऊनही परिस्थितीत बदल होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला.
आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अतिरिक्त पोलीस आयुक्त विनिता साहू, डीसीपी रमेश धुमाळ, वाहतूक पोलीस उपायुक्त आदित्य मिर्खेलकर आणि डीसीपी अन्नपूर्णा सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्याय यांनीही घटनास्थळी भेट दिली. परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले आणि वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या टिप्पर चालकाला पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले आहे. मानकापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
गोधनी रोडवरील अपघातांच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षा आणि महापालिकेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या मते, प्रत्येक दुर्घटनेनंतर अधिकारी घटनास्थळी येऊन आश्वासने देतात; मात्र प्रत्यक्षात रस्त्याची स्थिती सुधारत नाही. त्यामुळे आणखी एखाद्या निष्पापाचा बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.