
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : देशातील लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीमांकन (डिलिमिटेशन) घटनादुरुस्ती विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार लोकसभेतील खासदारांची संख्या सध्याच्या ५४३ वरून वाढून ८१५ पर्यंत पोहोचू शकते. विशेष म्हणजे, प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याची तरतूद प्रस्तावित असल्याचे सांगितले जात आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडले जाणार?
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या दोन महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने १ ते ३ डिसेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याचे वृत्त आहे. या अधिवेशनात संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
विरोधकांची मागणी मान्य झाल्याचा दावा-
सीमांकनाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून अनेक दिवसांपासून आक्षेप नोंदवले जात होते. विशेषतः दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होऊ नये, अशी भूमिका काही विरोधी पक्षांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांमध्ये समान प्रमाणात वाढ करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याचे वृत्त आहे.
तसेच पुढील २५ वर्षांसाठी सीमांकन प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणीही मान्य झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे राज्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत निर्माण झालेला वाद कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्रातील खासदारांची संख्या ४८ वरून ७२ होणार?
या प्रस्तावानुसार महाराष्ट्रालाही लोकसभेच्या जागांमध्ये मोठी वाढ मिळू शकते. सध्या महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. ५० टक्के वाढ लागू झाल्यास ही संख्या ७२ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
लोकसभेतील जागांचे गणित काय?
सध्याची लोकसभेची सदस्यसंख्या : ५४३
प्रस्तावित लोकसभेची सदस्यसंख्या : ८१५
जागांमधील प्रस्तावित वाढ : ५० टक्के
महाराष्ट्रातील सध्याच्या जागा : ४८
महाराष्ट्रातील संभाव्य जागा : ७२
सीमांकन स्थगित ठेवण्याचा प्रस्तावित कालावधी : २५ वर्षे
मात्र, या सर्व तरतुदी प्रत्यक्षात लागू होण्यासाठी संसदेची मंजुरी आणि आवश्यक घटनात्मक प्रक्रिया पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनात सरकार कोणती भूमिका मांडते आणि विरोधकांची भूमिका काय असते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.