बाळाच्या जन्मानंतर मिळणार १५ दिवसांची भरपगारी रजा; तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

    26-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

चेन्नई : नव्या बाळाच्या आगमनानंतर आईसोबतच वडिलांनाही बाळाच्या संगोपनासाठी वेळ देता यावा, यासाठी तामिळनाडू सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विवाहित पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना आता बाळाच्या जन्मानंतर १५ दिवसांची भरपगारी पितृत्व रजा मिळणार आहे. मुख्यमंत्री थलापती विजय यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, या निर्णयासंदर्भात शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांना ही १५ दिवसांची रजा बाळाच्या जन्माच्या १५ दिवस आधी किंवा जन्मानंतर घेता येणार आहे. तसेच बाळाच्या जन्मापासून सहा महिन्यांच्या आत या रजेचा लाभ घेण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

महिला सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ३६५ दिवसांची प्रसूती रजा दिली जाते. त्याच धर्तीवर पुरुष कर्मचाऱ्यांनाही पितृत्व रजा देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून १५ दिवसांची भरपगारी रजा मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट केले.

वडिलांची जबाबदारीही महत्त्वाची-

गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मानंतरच्या काळापर्यंत आईला शारीरिक आणि भावनिक आधाराची गरज असते. या काळात वडिलांची साथही तितकीच महत्त्वाची ठरते. नवजात बाळाची काळजी घेणे, आईला मदत करणे आणि संगोपनातील जबाबदाऱ्या सामायिक करणे यासाठी वडिलांना पुरेसा वेळ मिळावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

या निर्णयामुळे सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता येणार असून, मुलांच्या संगोपनात वडिलांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. मातृत्वासोबतच पितृत्वालाही महत्त्व देणारा हा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.