
Image Source:(Internet)
लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील राजकीय मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये आघाडीची चर्चा सुरू असतानाच जागावाटपावरून वादाची ठिणगी पडली आहे. अशातच समाजवादी पक्षाच्या खासदार इक्रा हसन यांनी काँग्रेसला त्यांच्या राजकीय योगदानाची आठवण करून देत, समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळेच राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले, असे ठणकावून सांगितले आहे.
दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, समाजवादी पक्षाने काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे. काँग्रेसमधील इच्छुक नेत्यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने आघाडीतील मतभेद अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
१११ जागांवर सपाची ठाम भूमिका-
समाजवादी पक्षाने आपल्या विद्यमान १११ विधानसभा जागांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यमान आमदारांच्या मतदारसंघांवर पक्षाचा नैसर्गिक दावा असून, या जागांवर काँग्रेसने हक्क सांगू नये, अशी भूमिका सपाकडून मांडली जात आहे. केवळ जागांची संख्या वाढवण्यापेक्षा निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी देणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही सपाचे म्हणणे आहे.
‘राहुल गांधींच्या पदामागे आमचेही योगदान-
कैराना मतदारसंघाच्या खासदार इक्रा हसन यांनी काँग्रेसला आघाडीतील राजकीय ताकदीची जाणीव करून दिली. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे आणि योगदानामुळेच काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आघाडीतील मित्रपक्षांच्या योगदानाचा विसर काँग्रेसने पडू देऊ नये, असा अप्रत्यक्ष संदेशही त्यांनी दिला.
इम्रान मसूद यांच्या नाराजीवर स्पष्ट भूमिका-
काँग्रेस नेते इम्रान मसूद यांच्या नाराजीबाबत विचारले असता इक्रा हसन यांनी त्यांची भावना समजू शकते, असे सांगितले. निवडणुकीत काही जागांवर अपेक्षित यश न मिळाल्याने नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या राजकीय हितापेक्षा आघाडीचे व्यापक हित अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या नेत्यांना वक्तव्ये जपून करण्याचा सल्ला-
काँग्रेसमधील काही नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरही इक्रा हसन यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या नेत्यांच्या विधानांची दखल घेऊन त्यांचे मूल्यमापन करावे, असे त्यांनी म्हटले. ही वक्तव्ये पक्षाची अधिकृत भूमिका असतील, तर ती मित्रपक्षांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवली पाहिजेत. अन्यथा अशा वक्तव्यांना आळा घालावा, असेही त्यांनी सुनावले.
निवडणुकीपूर्वीच आघाडीत कुरबुरी-
उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र येण्याची रणनीती आखत असताना जागावाटपावरून सुरू झालेली रस्सीखेच आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते. राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित करत सपाने काँग्रेसला आपल्या राजकीय ताकदीची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा कोणते वळण घेते आणि आघाडी टिकवण्यासाठी दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.