गोंदियात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शिक्षकावर गैरवर्तनाचे आरोप, संतप्त ग्रामस्थांचा शाळेत ठिय्या

    24-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

गोंदिया : विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकावरच अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्याने गोंदिया तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरी गावातील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सहावी आणि सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींशी शिक्षकाने अयोग्य वर्तन केल्याचा आणि शरीराच्या विविध भागांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

मुलींच्या तक्रारी ऐकून पालकांनी संताप व्यक्त करत थेट शाळेत धाव घेतली. यावेळी संबंधित शिक्षकाला जाब विचारण्यात आला. घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनीही शाळेच्या परिसरात गर्दी केली. संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला धडा शिकवण्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप केला. नागोराव कटरे (वय ५५) असे आरोप असलेल्या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित शिक्षकाला तातडीने निलंबित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास गावकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.