
Image Source:(Internet)
नागपूर : ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारण आणि समाजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. १२ डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी पवार यांच्याकडून याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांवर भाष्य करत पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांची कार्य करण्याची ऊर्जा आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रियता पाहता ते कधीच थांबणार नाहीत, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख केला. पवार यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, शरद पवार आजही विविध विकासकामे, प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांमध्ये तितक्याच उत्साहाने सहभागी होत आहेत. त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली असून, ते सातत्याने नव्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. ते आयुष्यात कधीही थांबणारे व्यक्तिमत्त्व नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कोयनेच्या पाण्याचा दुष्काळी भागांना फायदा देण्याचा विचार-
दरम्यान, कोयना धरणातील पाणी मुंबईकडे वळवण्याच्या चर्चेवरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसून, विविध पर्यायांची व्यवहार्यता तपासली जात असल्याचे त्यांनी सांगितले. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती केल्यानंतर सुमारे ६० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. या पाण्याचा अधिकाधिक उपयोग व्हावा, यासाठी ते पुन्हा उचलून उंच भागात आणण्याच्या पर्यायाचा अभ्यास सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
या योजनेचा लाभ केवळ मुंबईपुरता मर्यादित न ठेवता सातारा, सांगली आणि सोलापूरसारख्या पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जिल्ह्यांनाही देता येईल का, यावर विचार सुरू आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासोबतच कोकणातील पाण्याच्या मागण्यांचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पाणी उचलून नेण्याची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची असल्याने त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोयनेचे पाणी समुद्रात वाहून जाण्याऐवजी त्याचा उपयोग राज्यातील दुष्काळी भागांसाठी व्हावा, हा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेचा अभ्यास पूर्ण होण्यापूर्वीच त्यावरून राजकीय वाद निर्माण करणे योग्य नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा २७ वा वर्धापन दिन सोहळा-
कामठी येथील आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा २७ वा वर्धापन दिन महोत्सव २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, ओगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा तीन दिवसीय कार्यक्रम होत आहे. माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली.