Image Source:(Internet)
जालना : दुष्काळामुळे रोजगार ठप्प, हाताला काम नाही आणि घरखर्च भागवतानाही महिलांची दमछाक होत आहे. अशा संकटाच्या काळात कर्जाचे हप्ते भरण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तगादा लावला जात असल्याचा आरोप बदनापूरमधील Badnapur बचत गटांच्या महिलांनी केला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असताना कर्जवसुलीसाठी दबाव टाकला जात असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला असून, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी किमान नऊ ते दहा महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बदनापूरमधील बचत गटांच्या महिलांनी बँकेच्या वसुली प्रक्रियेवर आक्षेप घेत बँक अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचाही आरोप केला आहे. महिलांच्या तक्रारीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. दुष्काळी परिस्थितीत महिलांना दिलासा देण्याऐवजी कर्जवसुलीसाठी दबाव का टाकला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, महिलांनी केलेले आरोप शाखा व्यवस्थापक अंकुश सुत्राळे यांनी फेटाळून लावले आहेत. बचत गटातील कोणत्याही महिलेला कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बचत गटांच्या महिलांचा प्रश्न आणि बँकेची भूमिका यावरून बदनापूरमध्ये वाद निर्माण झाला आहे.