
Image Source:(Internet)
बीड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेला भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांत भारतीय अध्यात्मिक परंपरेविषयी अपुरी समज आणि वैचारिक विसंगती दिसून येत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शंभर वर्षांत राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता आणि संस्कारांच्या माध्यमातून समाजात योगदान दिले आहे. अशा संघटनेला असभ्य आणि जातिवादी ठरवणे म्हणजे राहुल गांधी यांच्या अज्ञानाचे दर्शन असल्याचा टोला राम कुलकर्णी यांनी लगावला.
अध्यात्मिक विचारधारा समाजात एकता आणि सद्भावना निर्माण करण्याचे काम करते, मात्र राहुल गांधी यांच्याकडून दुही निर्माण करणारे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संघावर टीका करण्याऐवजी राहुल गांधी यांनी आधी भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिक परंपरेचा अभ्यास करावा, असा सल्ला कुलकर्णी यांनी दिला.