नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा विकृत प्रकार; ज्युनिअर्सना मुलींचे कपडे घालण्यास भाग पाडल्याचा आरोप

    23-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : महाविद्यालयीन रॅगिंगच्या नावाखाली कनिष्ठ विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा संतापजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. बीडीएस प्रथम वर्षातील तीन विद्यार्थ्यांना वरिष्ठांनी कथितपणे कपडे उतरवणे, मुर्गा बनवणे, मुलींचे कपडे परिधान करणे आणि मेसमध्ये वरिष्ठांचे उष्टे अन्न खाण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अजनी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, १९ वर्षीय विद्यार्थी बीडीएस प्रथम वर्षात शिक्षण घेत असून, २६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २७ ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत त्याच्यासह अन्य दोन विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोली क्रमांक १०४ तसेच महाविद्यालयाच्या मेसमध्ये त्रास देण्यात आल्याचे आरोप आहेत. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी धमकावत महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागेल, असा दबाव टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तिन्ही विद्यार्थ्यांना कपडे उतरवून मुर्गा बनण्यास आणि मुलींचे कपडे परिधान करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर मेसमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांचे उष्टे अन्न खाण्यासही बाध्य करण्यात आले. या प्रकाराला विरोध केल्यास शिवीगाळ करून धमकावण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या आधारे अजनी पोलिसांनी आयुष सी.आर., नरेंद्र सिंह, अमान खान आणि एका अज्ञात युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महाविद्यालयीन शिक्षणाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना सुरक्षितता आणि सन्मान मिळणे अपेक्षित असताना, रॅगिंगच्या नावाखाली अपमानास्पद वर्तन आणि मानसिक छळाचे आरोप समोर आल्याने शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.