स्वतःच्या विवाहासाठी कैद्याला पॅरोलचा हक्क; नागपूर खंडपीठाने नकाराचा आदेश केला रद्द

    23-Nov-2026
Total Views |
 
Parole
 Image Source:(Internet)
 
नागपूर : कारागृह नियमावलीत स्वतःच्या विवाहासाठी पॅरोलची Parole स्वतंत्र तरतूद नसली, तरी कैद्याला विवाहासाठी पॅरोल नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. विवाहासंबंधी नियमातील तरतूद कैद्याच्या स्वतःच्या लग्नालाही लागू होते, असे स्पष्ट करत न्यायालयाने पॅरोल नाकारण्याचा आदेश रद्द केला. या निर्णयामुळे जन्मठेप भोगणाऱ्या कैद्याला विवाहासाठी सात दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.
 
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कुणाल ऊर्फ गोलू अनिल जयस्वाल याचा विवाह ४ डिसेंबर २०२६ रोजी नागपुरात होणार आहे. विवाहासाठी त्याने पॅरोल मागितला होता. पोलिसांच्या चौकशीत विवाह नियोजित असल्याचे स्पष्ट होऊनही कारागृह उपमहानिरीक्षकांनी ७ जुलै २०२६ रोजी त्याचा अर्ज फेटाळला. महाराष्ट्र कारागृह (फर्लो व पॅरोल) नियम, २०२४ मध्ये स्वतःच्या विवाहासाठी स्वतंत्र तरतूद नसल्याचे कारण देण्यात आले होते. त्यामुळे कैद्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
 
सुनावणीवेळी राज्य सरकारने नियम १२ (३) मध्ये कैद्याच्या मुलांच्या आणि भावंडांच्या विवाहासाठी पॅरोलची तरतूद आहे, मात्र स्वतःच्या विवाहासाठी उल्लेख नसल्याचा युक्तिवाद केला. याशिवाय, यापूर्वी पॅरोल घेतल्यामुळे एक वर्ष पूर्ण होण्याआधी पुन्हा पॅरोल देता येणार नसल्याचेही सरकारने न्यायालयात सांगितले.
 
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठाने सरकारचे हे आक्षेप फेटाळून लावले. विवाहासंबंधी नियमातील तरतूद कैद्याच्या स्वतःच्या विवाहासाठीही लागू होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच पॅरोलच्या कारणाचा आणि एक वर्ष प्रत्यक्ष कारावास भोगण्याच्या अटीचा परस्पर संबंध नसल्याचे निरीक्षण नोंदवले. यापूर्वीच्या निर्णयात नियम १४ मधील एक वर्षाची अट संविधानाच्या अनुच्छेद १४ आणि २१ चे उल्लंघन करणारी ठरविण्यात आल्याचा संदर्भही खंडपीठाने घेतला.
 
अखेर उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारण्याचा आदेश रद्द करून कुणाल जयस्वाल याला विवाहासाठी सात दिवसांचा पॅरोल मंजूर केला. या काळात ४ डिसेंबर वगळता दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नरखेड पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक असेल. पॅरोलचा आठवा दिवस पूर्ण होण्याआधी मोर्शी खुल्या कारागृहाच्या अधीक्षकांसमोर शरण येण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.