Image Source:(Internet)
नागपूर : शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना सतत धावपळ आणि तणावाचा सामना करणाऱ्या नागपूर पोलिसांना Nagpur Police आता फिटनेस आणि खेळासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला आणि मानसिक तणावमुक्तीला प्राधान्य देत नागपूर शहर पोलिसांनी ‘प्रहार’ क्रिकेट टर्फ मैदान आणि अद्ययावत फिटनेस सेंटर सज्ज केले आहे. सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस जिमच्या आधुनिकीकरणासाठी बावनकुळे यांनी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.
सीआयडी कार्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रहार’ क्रिकेट टर्फ मैदानामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना क्रिकेट खेळण्यासाठी स्वतंत्र सुविधा मिळणार आहे. तर पोलिस मुख्यालयातील कॅन्टीनसमोरील जिमचे नूतनीकरण करून त्यात अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करण्याच्या दिशेने काम सुरू करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा उपक्रम साकारण्यात आला. उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री बावनकुळे यांनी क्रिकेट मैदानावर फलंदाजी करत खेळाचा आनंद घेतला, तर पोलिस आयुक्तांनी गोलंदाजी केली. त्यानंतर दोघांनी फिटनेस सेंटरमध्ये व्यायामही केला.
पोलिस कर्मचाऱ्यांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत, मानसिक दबावाखाली आणि दीर्घकाळ ड्युटी करावी लागते. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले. पोलिसांच्या तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. पोलिसांसाठी खेळ आणि व्यायामाच्या सुविधा उभारणे ही त्यांच्या कार्यक्षमतेसाठी सकारात्मक बाब असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्याबाबतही पालकमंत्र्यांनी आश्वासक भूमिका घेतली. आगामी हिवाळी अधिवेशनात पोलिस निवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ आणि सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने उभारण्यात आलेले क्रिकेट टर्फ आणि फिटनेस सेंटर नागपूर पोलिसांच्या कार्यसंस्कृतीत सकारात्मक बदल घडविणारे ठरू शकतात. पोलिसांच्या फिटनेससोबतच मानसिक स्वास्थ्य जपण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.