गोवारी शहिदांच्या बलिदानाला बावनकुळेंचे अभिवादन; समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

    23-Nov-2026
Total Views |
 
Bawankule
Image Source:(Internet) 
 
नागपूर : गोवारी Gowari समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढताना प्राणांची आहुती देणाऱ्या ११४ हुतात्म्यांच्या स्मृतींना महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीच्या वतीने आयोजित शहीद स्मृतीदिन कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी शहीद बांधवांच्या बलिदानाचे स्मरण केले.
 
गोवारी समाजाच्या हक्कांसाठी उभारलेल्या आंदोलनात ११४ बांधवांनी प्राण गमावले. त्यांच्या बलिदानामागील संघर्ष, त्याग आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी विसरता येणार नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. शहीद गोवारी बांधवांचे बलिदान हे समाजाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण स्मरण असून त्यांच्या त्यागाला सदैव आदराने स्मरले जाईल, असे बावनकुळे यांनी नमूद केले.
 
गोवारी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत शासन संवेदनशील असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ शहीदांना अभिवादन करणे नव्हे, तर त्यांच्या संघर्षाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या स्मृती जतन करणे ही समाजासह शासनाचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 
शहीद गोवारी बांधवांच्या त्यागातून समाजाच्या हक्कांसाठीचा संघर्ष आणि एकजुटीची प्रेरणा कायम मिळत राहील, अशा भावना व्यक्त करत बावनकुळे यांनी ११४ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.