तामिळनाडूत भीषण अपघात ;भरधाव कार झाडावर आदळली, ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    23-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

तिरुचिरापल्ली : तामिळनाडूमध्ये रविवारी झालेल्या भीषण रस्ते अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुरैयूर-मुसिरी महामार्गावर भरधाव कार झाडावर आदळल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी हा भीषण अपघात घडला. महामार्गावरून जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरात धडकली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, कारमधील आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त; आर्थिक मदतीची घोषणा-
या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रति श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला २ लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांकडूनही दुःख व्यक्त-
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय सी. जोसेफ यांनीही या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.